तांडा-वस्तीच्या विकासासाठी निधीची वाढीव तरतूद करणार – विजय वडेट्टीवार

जिल्हास्तरीय समिती गठीत करणार

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : राज्यातील बंजारा समाजाच्या विकासासाठी असलेल्या विविध विकासयोजनांच्या तरतुदीत वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे. बंजारा समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत करून या समितीमध्ये बंजारा समाजाच्या प्रतिनिधीचा समावेश करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना निधी वाटपाबाबत इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आमदार राजेश राठोड, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, यासह ओबीसी व्हिजे-एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रकाश राठोड, साधनाताई राठोड यासह या समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, बंजारा समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यवतमाळ, नांदेड, जालना, परभणी, बीड, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, वाशिम या दहा जिल्ह्यात वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करून या समितीमध्ये बंजारा समाजाचे प्रतिनिधी नेमण्यात यावेत. जेणेकरून या समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल. तांडा/वस्तींचा विकास करताना पाणी, रस्ते व समाज मंदिर या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देशही मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here