नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर ८ लाखांची लाच घेताना जाळ्यात

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर येवले यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.१०) अटक केली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेला राजेवाडी (ता.नाशिक) येथील प्राथमिक शिक्षक पंकज रमेश दशपुते यांचा शोध पथक घेत आहेत.ठाणे विभागाच्या पोलीसांनी नाशिकमध्ये येवून ही कारवाई केल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

शासनाने मंजुर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरु करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी लाचेची रक्कम मागितली होती. यानंतर तक्रारदार संस्थाचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याचे महासंचालकांकडे तक्रार केली होती. यानुसार त्यांच्या आदेशान्वये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहनिशा करत पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य जाणवले. यानुसार ठाणे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील सापळा अधिकारी पल्लवी ढगे यांच्या पथकाने नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालगत सापळा रचला. शिक्षणाधिकारी डॉ.झनकर यांनी यासंदर्भात कारचालक येवले यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार मंगळवार (दि.१०) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ८ लाख रुपये स्विकारताना येवले यास ताब्यात घेण्यात आले.

त्याची कसून चौकशी केली असता झनकर यांच्या आदेशान्वये त्याने रक्कम घेतल्याचे समजल्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेच्या वास्तुमध्ये धडक देत झनकर यांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतले. ढगे यांनी झनकर यांची या गुन्ह्याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत जिल्हा परिषदेत चौकशी व पडताळणी केली असता त्यांनी तडजोअंती ८ लाखांची रक्कम स्विकारल्याचे मान्य करत पुढील व्यवहार चालक येवलेसोबत करण्यास सांगितले होते, अशी माहिती पथकाच्या सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी राजेवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक पंकज रमे दशपुते यांनाही पथकाने ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here