अभिनेता श्रेयस तळपदेवर नाटकाचा सेट चोरल्याचा आरोप; शिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : कोरोना काळात नाट्यसृष्टीतील काम ठप्प झाले होते. मात्र याचदरम्यान गोडावूनमध्ये सुरक्षित ठेवलेला अद्वैत थिएटर या नाट्यनिर्मिती संस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांनी त्यांच्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट चोरीला गेला असल्याची तक्रार शिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. ‘

कोरोनामुळे सध्याच्या लॉकडाउनच्या काळात नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे माझ्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या काळाचौकी येथील गोडावूनमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांनी गोडावून मालकास खोटे सांगून गोदामातून चोरून ‘भक्षक’ या एकांकिकेच्या चित्रीकरणासाठी वापरला आहे,’ असे भंडारे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान याबाबत श्रेयस तळपदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मी नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही. मी आमच्या ‘नाइन रसा’ या ओटीटी प्लॅफॉर्मवर नाट्यनिर्मात्यांनी निर्मिलेल्या कलाकृतींचे सादरीकरण करतो. अनेक निर्माते आणि त्यांची नाटके, एकांकिका आमच्या प्लॅटफॉर्मवर येत आहेत. त्या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी संबंधित नाटकाच्या निर्मात्यांची असते. त्यामुळे माझे नाव यात गुंतवणे चुकीचे आहे. केवळ माझी बदनामी करण्याचा किंवा माझ्या नावाचा प्रसिद्धीसाठी वापर करून स्वतः प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न असेल; तर ते चुकीचे आहे. माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्यास मी माझ्यावतीने पुढील कायदेशीर हालचाली करेन असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here