मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : ई पीक पाहणी प्रकल्प हा प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा प्रकल्प आहे. महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा पथदर्शी प्रकल्प असून आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे स्वरुप जरी मर्यादित स्वरुपातले असले तरी याचा होणारा परिणाम हा व्यापक स्वरुपातील आहे.टाटा ट्रस्ट मार्फत सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या दोन जिल्हयात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता मात्र आता हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ईपीक पाहणी प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आज (दि.१३) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे “ई-पीक पाहणी” प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषी मंत्री श्री.भुसे म्हणाले की, ई- पीक पाहणी प्रकल्प महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राबविण्यात येणार असून विकेल ते पिकेल या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प असणार आहे. शेतकऱ्याला स्वत: पिकांची नोंद करता येणार असून शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातील पिकांची सात बारामध्ये स्वत: नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणारआहे.






