स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण आदरांजली

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली.

“महाराष्ट्राच्या राजकारणातले सदाबहार, हसतमुख, दिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वलस्थानी नेले. पायाभूत सुविधा उभारताना महाराष्ट्राचा प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार जाणीवपूर्वक जपला. महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला. सर्वांना सोबत घेऊन राज्याला पुढे नेणारे सर्वमान्य, अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय विलासराव देशमुख कायम स्मरणात राहतील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली.

https://www.facebook.com/AjitPawarSpeaks/posts/4256595894448168

स्वर्गीय विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बाभळगावच्या सरपंचपदापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत, पुढे केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाचा, कठोर परिश्रमांचा होता. या प्रदीर्घ प्रवासात राज्यातील जनतेच्या सुख-दु:खांशी समरस होऊन त्यांनी काम केले. जनतेला मदतीसाठी सहज उपलब्ध होऊ शकणारे ते नेते होते. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी, प्रशासकीय कौशल्य होते. नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. मुंबई महानगराच्या विकासात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्वप्नातील पुरोगामी, प्रगत, संवेदनशील, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here