मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभर ध्वजारोहण केलं जात आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणात साजरा करणारच अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं.
स्वातंत्र्यदिनानंतर १६ ऑगस्टपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जर परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयी भूमिका स्पष्ट केली. कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो”, असं ते म्हणाले.






