अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला

काबूल : तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानच्या सर्वच प्रमुख शहरांचा ताबा मिळविल्यानंतर अखेर राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला आहे. तालिबानी बंडखोरांसमोर अफगाणिस्तान सरकारने गुडघे टेकले असून अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून ताजिकिस्तानचा आसरा घेतला आहे.

राष्ट्रपती भवनाचा ताबा घेताच तालिबान्यांनी त्याचे नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले. या घटनेनंतर ठिकठिकाणी चकमकी, गोळीबार सुरू आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याचे तालिबानने जाहीर केले.

तालिबानने दहा दिवसांत मजार-ए-शरीफ, जलालाबादचा ताबा घेतला. मजार-ए-शरीफ हे तालिबानविरोधी शहर मानले जाते. त्यानंतर जलालाबाद या शहराचा ताबा प्रतिकार न करता तालिबानला मिळाला. भारताने या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली नसून सध्या तेथे अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

काबुलमधून भारतीय दूतावासातील कर्मचारी व इतर नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान पाठविण्यात आले होते. मात्र, ते काबुलमध्ये दाखल होण्यापूर्वीच परिस्थिती बदलली. विमानतळावर एटीसीचे कर्मचारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे विमान तब्बल एक तास काबुलच्या विमानतळाजवळ घिरट्या घालत होते. सुरक्षेसाठी वैमानिकांनी काही काळासाठी विमानाचे रडारही बंद केले होते. अखेर विमान उतरविण्यात आले. दूतावासातील सर्व कर्मचारी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांना घेऊन विमान मायदेशी परतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here