लहान मुलांच्या शॉपिंग मॉलमधील प्रवेशाबाबत राज्य सरकारचा सुधारित आदेश

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत १५ ऑगस्टपासून नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. यात कोविड वरील लसचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या असल्या तरी १८ वर्षांखालील मुलांबाबत मात्र स्पष्टता नव्हती. त्यातही या मुलांना शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश मिळणार की नाही, यावरूनही संभ्रम होता. हा संभ्रम राज्य सरकारच्या सुधारित आदेशाने आता दूर झाला आहे.

अठरा वर्षांखालील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे या वयोगटातील मुलामुलींना मॉलमध्ये प्रवेश देताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक राहील, असे सुधारित आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे लहान मुलांना मॉलमध्ये प्रवेश कशाप्रकारे दिला जाणार हे स्पष्ट झाले आहे.

नवे आदेश १५ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहेत. यात शॉपिंग मॉलबाबतही दिलासा दिला गेला आहे. राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १०.०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील, अशी अट ही मुभा देताना घालण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here