डिस्चार्जनंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी : जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता
नाशिक (विशेष प्रतिनिधी) : प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आणि पुन्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आठ लाख रुपयांच्या लाचखोरीत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
डॉ. झनकर पोलिसांच्या ताब्यात असताना मंगळवारी (दि. १७) त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यावेळी जामिनासाठी खटाटोप करूनही तो नामंजूर करण्यात आला. त्यानंतर छातीत दुखत असल्याचे कारण पुढे करीत त्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. बुधवारी सकाळी त्यांचे नातेवाइक रुग्णालयात आले. पोलिसांच्या बंदोबस्तात झनकरांची देखभाल नातेवाइक करीत होते.
रुग्णालयात तपासणीअंती त्यांची प्रकृती स्थिर असल्याची नोंद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार झनकरांना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली. दुसरीकडे बुधवारी पुन्हा न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. परंतु, झनकरांचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्याचे समजले. त्यामुळे न्यायालयाने पुन्हा जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी कायम ठेवली. त्यामुळे सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर झनकरांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.






