कलिना विद्यापीठ परिसरात मुलांसाठी कोविड काळजी केंद्र सुरु

कोविडचा धोका टाळण्यासाठी जबाबदार नागरिक बना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्व थरांतील नागरिकांना आवाहन

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटीपार्कमध्ये उभारण्यात आलेल्या लहान मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करतांना बोलत होते.

केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या लाटेच्या शेवटी सणवार आले होते पण आता दुसरी लाट ओसरता ओसरता सण-उत्सवांची सुरुवात होते आहे. त्यात आपण गेल्या पंधरा दिवसांपासून निर्बंध शिथिल केले आहेत, पण ही मोकळीक आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवसाय सुरु राहावेत, अर्थचक्र थांबू नये म्हणून आहे. आपल्याला संसर्ग आणि मृत्यू दर आणखी कमी करायचा आहे. त्यामुळे कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या. आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून हे केंद्र उभारण्यात आले असून ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

असे आहे लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र
कलिना विद्यापीठ आय.टी. पार्क येथे उभारण्यात आलेले लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र हे पाच हजार चौरस फूटांचे असून रुग्ण खाटांची संख्या ३० आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रशस्त जागा आहे. हे केंद्र कोरोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण व त्यांच्या उपचाराकरिता तयार करण्यात आले आहे. याठिकाणी स्तनदा मातांना स्तनपानाकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त मुलांसोबत पालकांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या कोरोना काळजी केंद्रात २४ तास स्वच्छता व सुरक्षितेसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांवर महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी लहान मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजन उपक्रम उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या केंद्रात लहान मुलाना दवाखान्यात आल्यासारखे वाटू नये व आनंददायी वातावरण असावे असा प्रयत्न करण्यात आला आहे. रंगीबिरंगी भिंती, वेगवेगळी खेळणी, कार्डबोर्डचे बेड्स, आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या कार्यक्रमास, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार संजय पोतनीस, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here