२०१९ मध्ये झाली होती प्रफुल्ल पटेल यांची ईडी चौकशी
मुंबई ( प्रतीनिधी ) – सक्तवसुली संचलनालय (ईडी) महाविकास आघाडीतील नेत्यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रकरण ताजे असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. सीजे हाऊस प्रकरणात ही चौकशी होत आहे.
यापुर्वी ईडीने २०१९ मध्ये प्रफुल्ल पटेल यांची तब्बल १२ तास कसून चौकशी केली होती. याच प्रकरणात ईडी पुन्हा चौकशी करत असल्याचे बोलल्या जात आहे. २०१९ मध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्या पत्नीसोबत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडीने प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले होते.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्यासोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याचा आरोप आहे. पटेल यांच्या कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमनसोबत आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचं आरोपात म्हटलं आहे. याचा तपास सध्या ईडीकडून करण्यात येत आहे.






