औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : मोदी सरकारमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेले राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडय़ात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. शुक्रवारी ही यात्रा जालना जिल्हय़ात आली. यावेळी बदनापूर येथे आयोजित सभेत पेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर येऊन टीका करतांना राहुल गांधी हे सांड असून कोणत्याच कामाचे नसलेले जनावर असल्याचे बोलले होते. दानवे यांच्या विधानावरून प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी दानवे यांच्याविरोधात उग्र आंदोलने केली.
या वादावर पडदा टाकताना दानवे यांची जीभ पुन्हा घसरली आणि त्यांनी थेट ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल आहेत’, असे सांगून टाकले. राहुल यांच्यावरील टीकेनंतर काँग्रेस-भाजपमध्ये जुंपलेली असताना आता भाजपमध्येच दानवेंच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
वृत्तवाहिन्यांनी रावसाहेब दानवे यांना थेट प्रश्न विचारला असता त्यांनी पुन्हा एकदा आपण राहुल गांधी यांना सांड म्हणाल्याचे कबूल केले. एवढेच नाही तर आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना त्यांनी बैलाचे उदाहरण दिले. शेतात काम करणारे बैल दोन प्रकारचे असतात. एक काम न करणारा आणि एक काम करणारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल आहेत आणि राहुल गांधी हे काम न करणारा सांड बैल. कोणत्याही कामाचे नसलेले जनावर.






