टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे आज (२४ ऑगस्ट)पासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय पथकाला मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेत पदकाचा दावेदार असणारा आणि भारताचा ध्वजवाहक मरियप्पन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यासह आणखी एक खेळाडू आणि चार कोचिंग स्टाफमधील लोकांना कोरोनाची लागण झाल्याने हे सर्वजण क्वारंटाइन झाले आहेत.
कोरोना झाल्याने आज संध्याकाळी होणाऱ्या उद्घाटन समारंभात मरियप्पनला भाग घेता येणार नाही. त्याच्या जागी भालाफेकपटू टेक चंद हा भारताचा ध्वजवाहक असेल. भारताचा थाळीफेकपटू विनोद कुमार आणि एक कोच तसेच सपोर्ट स्टाफमधील तिघांना करोनाची लागण झाली आहे. करोनाझाल्यामुळे विनोद देखील उद्घाटन समारंभात भाग घेणार नाही. मरियप्पन थंगवेलू हा रियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता आहे.
टोकियोत आजपासून ही स्पर्धा सुरू होईल. भारतीय वेळेनुसार साडेचार वाजता उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे. या वेळी १६२ संघ भाग घेतील. यातील पाच देश प्रथमच पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणार आहेत. पुढील १३ दिवस २२ खेळात एकूण ५४० इव्हेंट्स होतील. ज्यात ४ हजार ४०० खेळाडू सहभाग होणार आहेत.






