वडिलांचं डायलिसिस करायला गेलेल्या मुलीवर नवी दिल्लीतील रुग्णालयात बलात्कार

नवी दिल्ली : देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडिलांचं डायलिसिस करायला गेलेल्या मुलीवर रुग्णालयातच बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये आपल्या वडिलांचं डायलिसिस करण्यासाठी एक १४ वर्षीय मुलगी रुग्णालयात आली होती. त्यावेळी रुग्णालयात हाऊसकिपिंगचं काम करणाऱ्या एका व्यक्तीने मुलीला गाठलं आणि तिच्यावर बलात्कार केला .

आरोपीने काहीतरी खोटं कारण सांगून मुलीला रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये नेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदाबादच्या सेक्टर १६ मध्ये असलेल्या एका रुग्णालयात हा भयंकर प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. रुग्णालयात तो हाऊसकिपिंगचं काम करतो. २१ ऑगस्ट रोजी १४ वर्षीय मुलगी वडिलांच्या डायलिसिससाठी रुग्णालयामध्ये गेली होती. त्यावेळी वडिलांचं डायलिसिस सुरू असताना मुलगी बाथरुममध्ये गेली. तेथून बाहेर आल्यावर तिथेच आरोपी उभा होता. त्याने काहीतरी कारण सांगून तिला बेसमेंटमध्ये नेलं.

रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नराधमाने तेथून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात येत आहे. रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here