कर्जत-कोंडीवडे रस्ता खड्ड्यात; नागरिकांमध्ये तीव्र संताप

कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : कर्जत तालुक्यातील वासरे खोंडा म्हणून समजल्या जाणार्‍या कोंडीवडे भागात जाणारा रस्ता सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. या रस्त्याचे नूतनीकरण काम सार्वजनिक बांधकाम विभागाने जून २०२१ रोजी मंजूर केले असले तरी सध्या रस्त्याची अवस्था लक्षात घेता या भागातील गणपती बाप्पाचा प्रवास खड्ड्यातून होणार, असेच सध्यातरी वाटते आहे.

आम्ही रस्त्याचे काम व्हावे यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले आहे, आमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आलेले आंदोलन हे तसे पहिली झलक होती, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे डांबरीकरण आणि कॉंक्रीटीकरणकरणाने काम सुरू केले नाही तर प्रखर आंदोलन केले जाईल.
शरद लाड-माजी नगराध्यक्ष,कर्जत


कर्जत येथील दहिवली भागातून कोंडीवडे जाण्यासाठी रस्ता आहे. त्यात या कोंडीवडे रस्त्याचा समावेश काही वर्षांपूर्वी चिंचवली-कडाव-तांबस-वेणगाव-दहिवली असा नवीन राज्यमार्ग तयार केला. त्यामुळे कर्जतक कोंडीवडे राज्यमार्ग रस्त्याची स्थिती आणि दर्जा सुधारेल अशी सर्वांना खात्री होती. मात्र कर्जत-कोंडीवडे या रस्त्याचा समावेश राज्यमार्गात समावेश होऊनदेखील या भागातील जनतेच्या नशिबी खड्ड्यातून प्रवास असे आजही सुरू आहे.

कर्जत शहरातील दहिवली भागातून आकुर्ले- शिरसे-तमनाथ-आडोशी-सांगवी-खांडपे-कोंडीवडे असा हा राज्यमार्ग गेल्या काही वर्षात खड्ड्यात हरवला आहे. त्याचवेळी याच भागातील खांडपे-मूळगाव-माणगाव या रस्त्याची स्थिती देखील दयनीय आहे. त्यामुळे आपल्या नशिबी खड्ड्यातून प्रवास आहे अशी भावना कर्जतकर कोंडीवडे रस्त्याने प्रवास करणार्‍या वाहनचालक यांना वाटत आहे. हा रस्ता ज्यावेळी राज्यमार्गात रूपांतरीत झाला, त्यावेळी वासरे खोंडा भागातील रहिवाशांना नव्याने अधिक रुंदीचा रस्ता तयार होईल, अशी खात्री झाली होती.

कर्जत – कोंदिवडे रस्त्याचे नुतनीकरण काम ’पुरवणी अर्थसंकल्प २०१९’ मध्ये रस्ता मजबुतीकरणाचे काम मंजूर आहे. यामध्ये राजमाता जिजाऊ उद्यान ते आकुर्ले, शिरसे, सांगवी आणि कोंदिवडे गावात कॉंक्रीटीकरण आणि उर्वरित भागात डांबरीकरण काम प्रस्तावित आहे तर दहिवली परिसरामध्ये आर सी सी गटारे प्रस्तावित आहेत. या रस्त्याच्या कामाची निविदा ३ जून २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम तात्काळ हाती घेण्यात येईल. सध्या खडी व ग्रीटने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम प्रगतीत आहे.

– अजयकुमार सर्वगोड, प्रभारी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मात्र या रस्त्यातील पोपट बागसमोरील फक्त १०० मीटर रस्ता कॉंक्रीटचा बनला आणि बाकी रस्ता आजही प्रशस्त होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची कर्जत नगरपालिका हद्दीत आकुर्ले पर्यंतचा रस्ता देखील सुस्थितीत नाही. पुढे तर अगणित खड्डे हे वाहनचालक यांचा प्रवास खड्ड्यातून सुरू होतो तो खांडपे गावापर्यंत खड्ड्यातूनच असतो. रस्त्यावरील असंख्य खड्डे आणि रस्त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने या रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण केले होते.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने खडी टाकून रस्त्यावरील खड्डे भरण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र थोडासा पाऊस पडला आणि लगेच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे बडे नेते यांचे वास्तव्य आहे. असे असताना रस्त्यात एवढे प्रचंड खड्डे ही बाब वासरे परिसरातील जनतेसाठी खेदजनक अशीच आहे. त्यामुळे यावर्षी देखील गणपती बाप्पाचे आगमन खड्ड्यातून होणार हे नक्की आहे.अशी कुजबुज जनमानसांत सुरू आहे



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here