ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर शाखेतच हल्ला

श्रीरंग सोसायटी भागातील घटना : हल्लेखोराला पकडून स्थानिकांनी केली मारहाण

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर शिवसेना शाखेतच हल्ला करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी रात्री ८.३० वाजता ठाणे येथील श्रीरंग सोसायटी भागात घडला.

हल्लेखोराने चॉपरने तीन ते चार वार केल्याने जयस्वाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

श्रीरंग सोसायटीजवळ असलेल्या शिवसेनेच्या शाखेत हा प्रकार घडला असून हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. जयस्वाल यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्लेखोरही जखमी असल्याचे समजते. आपआपसातील भांडणातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हल्लेखोराला तिथे उपस्थित असणाऱ्यांनी पकडले असून त्याला मारहाणही करण्यात आली आहे. त्यात जखमी असलेल्या हल्लेखोराला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here