मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता आरोग्यतज्ञांकडून व्यक्त केली गेली असतानाच आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील २२ जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील १२ वर्षांखालील चार मुलांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून १२ ते १८ वर्षांपर्यंतच्या १२ मुले आणि ६ कर्मचाऱ्यांवर भायखळ्याच्या रिचर्डसन ऍण्ड क्रुडासमधील कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हे तिसऱ्या लाटेचे संकेत मानले जात आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली जात असून त्यातून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन मुले काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ई विभागाकडून या अनाथाश्रमात राहणाऱ्या सर्वांसाठी मंगळवारी आरोग्य चाचणी शिबीर राबवण्यात आले. या चाचणीत १६ मुलांना आणि ६ कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळले. दरम्यान, हा अनाथाश्रम मुंबई महापालिकेने सील केला आहे.






