‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव : दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

तथाकथित पुरोगाम्यांच्या फसवणुकीला बळी न पडता गणेशभक्तांनी नैसर्गिक जलस्रोतात गणेशमूर्ती विसर्जन करावे ! – हिंदु जनजागृती समिती

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर निखिल ठाकूर) : गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन केल्याने प्रदूषण होते, अशी आवई काही तथाकथित पुरोगामी सर्वत्र उठवत आहेत. अगदी ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’पासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीही पाण्यात विसर्जन केल्याने प्रदूषण होत नाही, हे विविध प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदातच करण्याचा आग्रह ठिकठिकाणी प्रशासनही करत आहे. नंतर याच मूर्ती प्रशासन नदीत विसर्जित करते, असे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. आतातर ‘अमोनिअम बायकार्बोनेट’ या त्वचेला घातक असणार्‍या रसायनात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नव्हे, विरघळवण्यास भाविकांना सांगितले जाते. या सर्व उठाठेवी करण्याऐवजी भाविकांना शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्तींचा आग्रह का धरत नाही ? शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतात करायला का देत नाहीत ? जनभावनांचा विचार करून धर्मशास्त्रानुसार विसर्जन करण्याची व्यवस्था पोलीस-प्रशासनाने केली पाहिजे. कोणतीही प्रक्रिया न करता कोट्यवधी लीटर अतिदूषित सांडपाणी अनेक नद्यांमध्ये नगरपालिकांकडून सोडले जाते.

प्रदूषणाच्या काळजीचा देखावा करणारे प्रशासन आणि तथाकथित पुरोगामी भाविकांची फसवणूक करत असून अशा कुठल्याही फसवणूकीला बळी न पडता गणेशभक्तांनी नैसर्गिक जलस्रोतील वाहत्या पाण्यातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि गणेशाची कृपा संपादन करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव : दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विशेष संवादात ते बोलत होते.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस या वेळी म्हणाले, ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’ची गणेशमूर्ती ही धर्मशास्त्रसंमत नाही. तसेच त्याच्यातून गणेशाची पवित्रके येत नाहीत. त्यामुळे ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’ची गणेशमूर्ती घरी आणू नये. पंचगव्य, शेण आदी गोष्टींपासून सुद्धा गणेशमूर्ती बनवू नये. पार्थिव सिद्धिविनायक व्रतानुसार शाडूमाती किंवा चिकणमातीची गणेशमूर्ती आणावी. माती स्वत:च ‘इकोफ्रेंडली’ आहे. हा भाग लक्षात घ्यायला हवा. कोरोनाच्या काळात शाडूची माती उपलब्ध न झाल्यास घराच्या अंगणातील चिकणमातीची 6 ते 7 इंचाची गणेशमूर्तीही बनवू शकतो. मातीसुद्धा उपलब्ध न झाल्यास प्राणप्रतिष्ठा विधी न करता श्रीगणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करू शकतो.

हल्ली कुंडीमध्ये ‘बी’ ठेऊन गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा प्रचार पर्यावरणवाद्यांकडून केला जातो. वृक्षारोपण करायला वर्षाचे 365 दिवस असतांना केवळ गणेशोत्सवात बीजाच्या रूपात गणेशाला का पूजायचे, हा आमचा पर्यावरणवाद्यांना प्रश्‍न आहे ?’ हिंदु विधिज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी म्हणाले, ‘कागदी लगद्याच्या मूर्ती अत्यंत प्रदूषणकारी असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे आम्ही हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने ‘राष्ट्रीय हरित लवादा’त दाखल केलेल्या याचिकेमुळे कागदी लगद्यापासून मूर्ती बनवण्याच्या शासनाच्या अध्यादेशावर वर्ष 2016 मध्ये स्थगिती आली आहे. तरीही आज ‘इकोफ्रेंडली’च्या नावाखाली कागदी लगद्याच्या मूर्तींचा प्रसार सर्रासपणे केला जात आहे. याविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here