पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात आरोपी कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्या घरमालकांची साक्ष आणि बेबी जॉन यांची उर्वरित उलट तपासणी झाली.आज न्यायालयात बेबी जॉन यांची उर्वरित उलट तपासणीत एपीआय अश्विनी बिंद्रे हिच्या हत्येदिवशी आणि पुढील चार दिवसाचे मोबाईल लोकेशन हे कुंदन भंडारीच्या मोबाईल नव्हेच असा वदवून घेण्याचा पूर्ण प्रयत्न आरोपीच्या वकिलांनी केला, पण हा प्रयत्न विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि टाटा टेलिकम्युनिकेशन चे नोडल ऑफिसर बेबी जॉन यांनी न्यायालयात कागदोपत्री पुरावे हजर करून धुडकावून लावला.
आरोपी कुरुंदकर ज्या घरात भाड्याने राहत होते त्या घराचे मालक कुमार नारायण घरत यांची आज कोर्टासमोर साक्ष झाली.”एपीआय अश्विनी बिंद्रेची हत्या ज्या फ्लॅट मध्ये झाली त्या मुकुंद प्लाझा मधील ४०१ मध्ये अभय कुरुंदकर रहात होता. कुरुंदकरला भाड्याने दिल्यानंतर मी कधी ही तो फ्लॅट कलर केला नव्हता , वारंवार सांगून ही फ्लॅटचा भाडेपट्टा कुरुंदकर केला नाही , फ्लॅटचे भाडे कर्डिले पोलिसच देत होता, कुरुंदकरने तो फ्लॅट कलर करण्यासाठी माझी परवानगी घेतली नव्हती, पण एप्रिल २०१६ ला तो फ्लॅट कुरुंदकरनी कलर करून घेतला आहे, ही बाब मला वॉचमनने सांगितली,” अशी साक्ष त्या मुकुंद प्लाझाचे मालक कुमार नारायण घरत यांनी कोर्टासमोर सांगितले.उलट तपासणीत कुरुंदकर त्या फ्लॅट रहातचं नव्हता हे सिध्द करण्याचा केविलवाणा प्रयत्न आरोपीच्या वकीलांनी केला पण तो फोल ठरला. त्यामुळेच अभय कुरुंदकर त्या फ्लॅट मध्येच रहात होता हे सिध्द झाले.
अश्विनी बिद्रे ज्या रूममध्ये राहत होते त्या फ्लॅट चे मालक रामानंद स्वामी यांची देखील साक्ष आज पनवेल न्यायालयात झाली. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, अश्विनी बिंद्रे या हार्मिनिक बिल्डींग मधील बी ५०१ मध्ये जुलै २०१५ पासून रहाण्यास होत्या , त्यांनी मार्च २०१६ पर्यंत भाडे मालकांच्या खात्यावर ऑनलाईन जमा केले , पण एप्रिल २०१६ पासून भाडे मिळाले नाही म्हणून एपीआय अश्विनी बिंद्रेना त्यांनी वारंवार फोन केला पण त्यांचा फोनच बंद येत होता. फ्लॅट चे मालक रामानंद स्वामी हे जून २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियातून भारतात आल्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशन मध्ये जावून अश्विनी बिद्रेचे वडील जयकुमार बिद्रे यांचा फोन नंबर घेतला आणि त्यांना फोन करून अश्विनी बिंद्रे आणि भाड्याबद्दल विचारणा केली, त्यावेळेस तुमचे भाडे तुम्हाला लवकरचं मिळेल आणि मॅडमचा आम्ही शोध घेतोय, असे त्यांना सांगण्यात आले.
आज न्यायालयात मा.न्यायमुर्ती माधुरी आनंद यांच्यासमोर सर्वांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली. यावेळेस विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, अश्विनी बिद्रेचे पती राजू गोरे, एसीपी संगिता शिंदे अल्फान्सो,आरोपी आणि आरोपीचे वकील हजर होते. या खटल्याची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे.






