जालना (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील भोकरदन शहरातील तरुणाला ट्रकने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की तरुण जागीर ठार झाला. शहरातील नवीन भोकरदन परीसरातील असलेल्या पंचायत समितीत कार्यालय समोर शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अनिल शिवाजी जाधव (२६) रा.फत्तेपूर ता. भोकरदन, जि. जालना असे मृत तरुणाचे नाव आहे.
अनिल शिवाजी जाधव हा तरुण पंचायत समिती कार्यालयाजवळील अमोल दौड यांच्या दुकानात मागील दोन वर्षांपासून टायर पंक्चरचे काम करीत होता. त्याची घरची परिस्तिथी अत्यंत हलाखीची असल्याने दोघे भाऊ रोजंदारीवर काम करीत होते. शुक्रवारी अनिल ट्युब आणायला शहरात आला होता. ट्युब घेऊन जालना रोडच्या दिशेने दुचाकीवर जात असताना विरुद्ध दिशेने जालन्याहून भोकरदनकडे भरधाव वेगाने येणारा लोडिंग मालाने भरलेला ट्रकच्या खाली सापडून जागीच ठार झाला.
अपघातात अनिलच्या डोक्यावरून टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तिथल्या नागरिकांनी घटनेची माहीती पोलिसांना दिली असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर फत्तेपूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले.






