धुळे (प्रतिनिधी) :राज्य परिवहन महामंडळाच्या साक्री आगाराचे चालक कमलेश बेडसे यांनी शनिवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठी लिहुन कमी पगार, तोही अनियमितपणे होत असल्याने आर्थिक संकटातून आत्महत्या करत असल्याचे म्हणत एसटी महामंडळ प्रशासनाला दोषी धरले आहे. त्यामुळे मदतीसह संबंधीतांवर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांसह कर्मचारी संघटनेने साक्री आगारात ठिय्या आंदोलन सुरू केले. रात्री नऊ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. अखेर विभाग नियंत्रक व तहसीलदारांच्या आश्वासनानंतर नातेाईकांनी आंदोलन मागे घेतले.
कमलेश भिकन बेडसे (वय ४६ रा. छडवेल कोर्डे ता. साक्री) असे मयत बस चालकाचे नाव आहे. त्यांनी आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत जिवनयात्रा संपविली. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी मिळून आली. त्यात त्यांनी एसटी प्रशासनाला दोषी धरले आहे. कमी पगार, तोही अनियमितपणे होत असल्यामुळे कर्जबाजारी होवून आर्थिक संकटामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. यास एसटी प्रशासनच जबाबदार असल्याचे म्हणत बेडसे यांच्या नातेवाईकांसह कर्मचारी संघटनेने साक्री आगारात ठिय्या आंदोलन सुरू केले. याबाबत कळताच अनेक बस चालक, वाहनांनी आगारात तसेच महामार्गावर बसेस उभ्या करून आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामुळे बससेवा विस्कळीत झाली होती. तसेच वाहतुक ठप्प झाली होती.
मृत कमलेश बेडसे यांच्या कुटुंबियांना कायदेशीर आवश्यक तो लाभ मिळून दिला जाईल. तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांच्या वारसाला नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिले. त्यानंतर प्रथम कर्मचारी संघटनेने ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र नातेेवाईकांनी महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यांनाही आश्वासन दिल्यानंतर अखेर आठ ते सव्वा आठ वाजता विभाग नियंत्रक सपकाळ व तहसीलदारांनी नातेवाईकांची समजूत काढत त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर बेडसे यांच्या कुटुंबियांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतल्याचे श्रीमती सपकाळ यांनी देशदूतला सांगितले. त्यानंतर मृत बेडसे यांच्यावर रात्री साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.






