धुळे (प्रतिनिधी) : तालुक्यातील हट्टीगाव शिवारात नंदुरबारच्या पेट्रोल पंप चालकाला तिघांनी अडवत धक्काबुक्की करत जबरीने त्यांच्याकडील सहा लाखांची रोकड व मोबाईल असा ६ लाख १८ हजारांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी तिघा अज्ञात तरूणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पेट्रोल पंप चालक केदार हिरालाल माळी (वय ५२ रा. ४०७, तुळशिनिकुंज, महाळा कॉलनी, तळोदा रोड, नंदुरबार) यांनी निजामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते बुधवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास वाहनाने हट्टीगाव शिवारातून जात होते. त्यादरम्यान हट्टी खुर्द गावापासून तीन किमी अंतरावर एैजाळेकडे जाणार्या रस्त्यावर एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या तिघा तरूणांनी त्यांना अडविले.
धक्काबुक्की करत जबरीने त्यांच्याकडील बॅगेतील ६ लाख १ हजार १८० रूपये, बँकेचे चेक बुक, टँकरची चावी, आधारकार्ड तसेच १५ हजारांचा मोबाईल, खिशातील २ हजारांची रोकड असा मुद्येमाल घेवून पसार झाले. याप्रकरणी तिघांवर भादंवि कलम ३९२, ३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि श्रीकांत पाटील करीत आहेत.






