कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा यांना समन्स बजावले आहे. ‘ईडी’कडून पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात चौकशी सुरू आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना ६ सप्टेंबर रोजी ‘ईडी’ने हजर राहण्यास सांगितले आहे. तर त्यांची पत्नी रुजीरा हीला मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत समन्स पाठवून 1 सप्टेंबरला ‘ईडी’पुढे हजर राहण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱयांनी दिली. पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर ईडीने नोव्हेंबर, २०२० मध्ये पीएमएलएच्या फौजदारी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये आसनसोल आणि आसपासच्या राज्यातील पुनुस्टोरिया आणि काजोरा भागातल्या ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड खाणींशी संबंधित कोटय़वधी रुपयांचा कोळसा चोरीचा होता.
स्थानिक राज्य संचालक अनुप माझी उर्फ लाला या प्रकरणात मुख्य संशयित असल्याचा आरोप आहे. या बेकायदेशीर व्यापारातून मिळालेल्या निधीचे अभिषेक बॅनर्जी लाभार्थी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.






