पाच तासांपासून ईडीचे अधिकारी करत आहेत चौकशी
मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीचे अधिकारी मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची गेल्या पाच तासांपासून चौकशी करत आहेत. ही चौकशी दिल्लीत सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. हे प्रकरण कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर या व्यक्तिशी संबंधित आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जॅकलिन फर्नांडिसच्या आधी अभिनेत्री यामी गौतमला देखील ईडीने या वर्षाच्या सुरुवातीलाच समन्स बजावले होते. फेमा कायद्याअंतर्गत आर्थिक अनियमितेत प्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामीच्या बँक खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशी संस्थेकडून आली होती. मात्र, ही रक्कम स्विकारताना फेमा कायद्यातील नियमांचे पालन करण्यात आलेलं नव्हते. म्हणूनच, बँकेने ईडीला या व्यवहाराबद्दल माहिती दिली होती.
सध्या यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघीही सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांच्यासमवेत ‘भूत पोलिस’ या आगामी हॉरर चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १७ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.






