मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण
ठाणे (जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वन्नम) : राज्य सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार श्री. सरनाईक यांच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते आज ऑनलाईन पद्धतीने पार पडले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत , पालकमंत्री एकनाथ शिंदे , आमदार रवींद्र फाटक , महापौर नरेश म्हस्के , विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा नगरसेविका परिषाताई सरनाईक व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टने – ठाणे शहरात, रेमंड कंपनी समोर, विहंग पाम क्लब येथे हा कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. त्यातून जनतेला विनामूल्य ऑक्सिजन मिळणार आहे. यावर्षीही दहीहंडी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करून आम्ही जनतेच्या आरोग्यासाठी हे विविध उपक्रम सुरू केले आहेत.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. मात्र कोरोना निर्बंधासाठीचे नियम मोडून आंदोलने केली जात आहेत. आंदोलन करायचेच असेल तर कोरोना विरुद्ध करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या आमदार सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत तसे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे येथून पुढेही निधी मिळेल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री. सरनाईक यांचे अभिनंदन केले.






