ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) । ठाणे शहर पोलिस आयुक्तालय क्षेत्रात वाढत्या चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी आणि तोतया पोलिस बनून नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवली आहे. गुन्हे शाखा घटक-२ (भिवंडी) ने अत्यंत शिताफीने दोन वेगवेगळ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कल्याण-भिवंडी बायपासवर सापळा रचून रवींद्र धनाजी भोसले (२४ वर्ष) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. त्याने भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत, पुणे रेल्वे परिसरात एकूण १३ चेन स्नॅचिंग आणि ३ मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
चोरलेला माल त्याने अंबिवली येथील दिनेश पांडुरंग पाटील (४७ वर्ष) याला विकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून १५ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१ मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
‘पोलिस बतावणी’ करून नागरिकांना लुबाडणाऱ्या एका सराईत गुन्हेगारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद अजीज जाफरी (रा. लोणी काळभोर, पुणे) याला भिवंडीतून संशयास्पदरीत्या ताब्यात घेण्यात आले. त्याने भिवंडी शहरात तोतया पोलिस बनून २ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याने चोरलेले सोने कर्नाटक मधील बीदर येथील एका इसमाला विकले होते. त्याच्याकडून ४५ ग्रॅम वजनाचे (२,२०,००० रु. किमतीचे) सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.







