पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । लोहगाव येथील मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ॲाफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या १२ विद्यार्थिनींना दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या सर्व विद्यार्थिनींवर सध्या साईश्रद्धा हॉस्पिटल, लोहगाव येथे उपचार सुरू असून, कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा संताप विद्यार्थिनींनी व्यक्त केला आहे.
बाधीत विद्यार्थिनींशी संवाद साधला असता, त्यांनी कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. विद्यार्थिनींनी सांगितले की, ‘आम्ही वापरत असलेल्या पाण्याच्या फिल्टरमधून पिवळसर आणि घाण पाणी येत होते. १० फेब्रुवारी रोजी आम्ही पाण्याच्या टाकीत आणि बादलीत काळ्या रंगाच्या अळ्या पाहिल्या होत्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही कॉलेज प्रशासनाला दाखवले, त्याबाबत तक्रारही केली तरी कोणतीही कारवाई केली नाही. ‘जानेवारी महिन्यातच आम्ही दूषित पाण्याबाबत तक्रार केली होती; पण त्यावेळी फक्त टाकी स्वच्छ केल्याचे भासवले गेले. फिल्टर बदललाच नव्हता. आता विषबाधा झाल्यावर त्यांनी घाईघाईने फिल्टर बदलले आहेत. जेव्हा आम्ही फिल्टर उघडून दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला ‘तुम्ही कोण विचारणार? तुम्हाला तो अधिकार नाही’, असे म्हणून गप्प करण्यात आले.
विषबाधेची तीव्रता इतकी होती की, विद्यार्थिनी वसतिगृहातच चक्कर येऊन पडू लागल्या. चालता बोलता विद्यार्थिनी खाली पडत होत्या. श्रेणी महाडिक (चिपळूण), रुपाली महाजन (जळगाव), श्रीनिधी गुप्ता (नागपूर), साक्षी स्वामी (अहिल्यानगर), सिद्धी उमाटे (लातूर), श्रेयश इरकर (धाराशिव), मानसी देशमुख (परभणी), कुनिका देवळकर (चंद्रपूर), कमलेश निकम (चाळीसगाव), तृप्ती गावंडे (संभाजीनगर), प्रणया चव्हाण (कारंजा), समृद्धी हांडे (जुन्नर) या विद्यार्थिंनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.







