वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडणारा माथेफिरू आरपीएफकडून गजाआड

वंदे भारत एक्सप्रेस

ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) । वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडून प्रवाशांसह रेल्वे प्रशासनाला हादरवून सोडणाऱ्या माथेफिरूचा दीड महिन्यानंतर छडा लागला आहे. या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्याला मुंब्रा येथून गुरुवारी १२ फेब्रुवारीला अटक केली.

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये साप सोडण्याची ही घटना २७ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. सीएसएमटी-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या ट्रेन नंबर २२२२५च्या कोच नंबर सी-१६ च्या शौचालयात एक साप आढळला होता. माहिती कळताच रेल्वेची यंत्रणाच सापाला पकडण्यासाठी कामी लागली होती. अखेर सोलापूर स्थानकावर साप ट्रेनच्या बाहेर काढण्यात यश आले होते. साप ट्रेनमध्ये पोहचलाच कसा, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर रेल्वे यंत्रणांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून साप ट्रेनमध्ये शिरला नाही तर त्याला एका माथेफिरून ट्रेनमध्ये आणून सोडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५(ब), १४७ आणि १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला जाऊ लागला. तब्बल दीड महिन्याच्या तपासानंतर मध्य रेल्वेच्या आरपीएफला लिड मिळाली आणि त्या आधारे आज मुंब्रा येथे आरोपी जगन अर्जुन भाले याला अटक केली.
आरोपी जगन भाले याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला कल्याण रेल्वे न्यायालयाने १४ दिवसांची दंडाधिकारी कोठडी (एमसीआर) दिल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने आज दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here