कर्मचाऱ्यांच्या टूलडाऊन आंदोलनाने नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमधील नोटांची छपाई बंद

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील करन्सी नोटप्रेसमध्ये व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमध्येे संघर्ष निर्माण झाला असून व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात कर्मचार्‍यांनी ‘टूल डाऊन’ आंदोलन पुकारले आहे. यामुळे नोटांची छपाई पूर्णपणे थांबली आहे. याबाबत व्यवस्थापनाने कामगार संघटनांच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी बोलावले असल्याचे समजते.

प्रेसमधील मशिनरी जुन्या झाल्या असून त्यांची क्षमता कमी झाली आहे. त्यातच कामगार संख्याही साडेतीन हजारांहून एक हजारांवर आली आहे. कामगार संख्या कमी होऊनही नोटांची छपाई मात्र दुपटीने वाढली आहे. यापूर्वीच्या व्यवस्थापनाने नेहमी कामगार संघटनांबरोबर चर्चा करून निर्णय घेतले मात्र आठवडाभरापूर्वी नव्याने दाखल झालेल्या चीफ जनरल मॅनेजर (सीजीएम) यांनी कामगार संघटनांना विश्वासात न घेता कामगारांची छळवणूक सुरू केल्याने या विरोधात संघटनांनी बंड पुकारले आहे

पाच वाजेपर्यंत कामाची वेळ असतांना सात वाजेपर्यंत थांबण्याचे व काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र या कामाचा कोणताही मोबदला कर्मचार्‍यांना दिला जाणार नाही. निर्णयाला विरोध करणार्‍यांना बदली करण्याची भिती दाखवली जाते अशाही कर्मचार्‍यांच्या तक्रारी आहेत. व्यवस्थापनाच्या या मनमानी कारभाराला कंटाळून संघटनांनी ‘टूल डाऊन’ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात आय.एस.पी.मजदुर संघ, आय.एस.पी., सी.एन.पी. स्टाफ युनियन व एस.सी/एस.टी. मायनॉरिटीज असोसिएशन सहभागी झाले आहे. व्यवस्थापनाने युनियनला विश्वासात न घेता काम करणे थांबवले नाही तर हे आंदोलन बेमुदत सुरू राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे नोटा छपाई पूर्णपणे ठप्प झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here