नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महसूल यंत्रणेला निर्देश
जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यामध्ये शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रारंभीच्या माहितीनुसार वाकडी येथील ६० वर्षीय महिला पुरात वाहून गेली आहे. याबरोबरच शेकडो जनावरे वाहून गेली असून अनेक जनावरे जागेवरच मृत्यूमुखी पडले आहेत. या नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. तसेच धुळे- औरंगाबाद महामार्गावरील औट्रम (कन्नडचा) घाटातील अडथळे दूर करीत महामार्ग वाहतुकीसाठी तातडीने मोकळा करावा, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज दिले.
सोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश परिस्थिती होवून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे परिसरातील तितूर, डोंगरी या नद्यांना पूर आला. या पुराचे पाणी नदी काठावरील गावांमध्ये व घरांमध्ये शिरले. त्यामुळे या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज दुपारी चाळीसगाव शहरासह वाकडी या गावाला भेट देवून पाहणी केली. यावेळी येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची माहिती देऊन नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांचेसोबत खासदार उन्मेष पाटील, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी घेतली नुकसानीची माहिती
पालकमंत्री वाकडी येथे नुकसानीची पाहणी करीत असतानाच चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेशी दूरध्वनीवर संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश देऊन शासन नुकसानग्रस्तांच्या पाठिशी असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजीमंत्री गिरीश महाजन यांचेशीही संवाद साधला.






