मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा. परंतु, केवळ पोषण महिन्याच्या स्पर्धेपुरतेच नव्हे तर वर्षभर काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
राष्ट्रीय पोषण महिन्याचा राज्यातील शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे अॅड. ठाकूर यांच्या हस्ते झाला. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव इद्झेस कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) आयुक्त रुबल अग्रवाल, राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानचे संचालक संजीव जाधव, आयसीडीएसचे उपायुक्त गोकुळ देवरे, सहायक आयुक्त विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
कुपोषण ही एक गंभीर समस्या असून त्यावर आपल्याला मात करायची आहे, असे सांगून महिला व बालविकास मंत्री अॅड. ठाकूर म्हणाल्या, पोषण महिन्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांना महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी लोकांमध्ये काम करणाऱ्यांना सहभागी करुन घ्यावे. कोविडचे नियम पाळून जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आणि लोकसहभाग वाढवून पोषण माहमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवावा.
अॅड. ठाकूर पुढे म्हणाल्या, शून्य ते 6 वर्ष वयोगटातील बालके असलेल्या स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांवर लक्ष ठेवायचे असून त्यामधील लहान बालकांना स्थलांतराच्या नवीन ठिकाणी पूरक पोषण आहार सुलभतेने मिळेल या बाबीची खात्री करावी लागेल. त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी राजमाता जिजाऊ मिशनच्या सहयोगातून तयार केलेले स्थलांतरित लाभार्थ्यांसाठीचे मायग्रेशन सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल.
आदिवासी भागामधील कुपोषण निर्मुलनासाठी रानभाज्यांमधील पोषक तत्त्वांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. तसेच या भाज्यांच्या उत्तम पाककृतींचा समावेश रोजच्या आहारात करणे उपयुक्त ठरेल, असे मत अॅड. ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.






