शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : कोरोना महामारीमुळे जवळपास दीड वर्षांपासून बंद असल्याने शिर्डीसह लगतच्या ४० गावातील आर्थिक अर्थकारण व बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर अडचणीत आली आहे. परराज्यात ज्याप्रमाणे मंदिरे उघडली आहेत, त्याप्रमाणे महाआघाडी सरकारनेदेखील शिर्डीसह महाराष्ट्रातील सर्व धार्मिक मंदिरे व प्रार्थनास्थळे तात्काळ उघडावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब काटकर, राहाता तालुकाध्यक्ष रमेश बनकर, शहराध्यक्ष वैभव सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
यासाठी लोकप्रतिनिधी व खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी कठोर भूमिका घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या म्हटले, शिर्डी परिसरात कुठल्याही प्रकारची कारखानदारी व प्रकल्प नाही. त्यामुळे या परिसराचे अर्थकारण साईबाबा मंदिरावर अवलंबून आहे. शिर्डीत येत असलेल्या साईभक्तांमुळे या परिसरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असतात. त्या माध्यमातून अनेकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारदेखील मिळत असतो. त्याबरोबरच या परिसरातील हॉटेल व्यवसायिक, व्यापारी, लहान मोठे व्यापारी, वाहनधारक लहान-मोठे कामगार, रिक्षाचालक, व्यवसायिक, सहकारी पतसंस्था, बँकिंग, शेतकरी यांना या माध्यमातून मोठा रोजगार आर्थिक व्यवहार सुरू असतात; मात्र साई मंदिर सुरू होत नसल्याने आता अनेकांचा संयम सुटला आहे. यामुळे कर्जाचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्याबरोबरच थकीत कर्जाचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे.
आता सर्वसामान्य माणसाचा संयम सुटत असताना केवळ मंदिरे व धार्मिक स्थळे बंद ठेवून महाआघाडी सरकार एकप्रकारे जनतेला वेठीस ठरत असून करोना आजाराच्या धर्तीवर प्रशासनाने योग्य ती दक्षता घेत नियम व अटी यास अधीन राहून तात्काळ महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे त्वरित सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय महागडी सरकारने घेतला पाहिजे, अशी मागणी काटकर यांनी केले आहे.






