जळगाव (महाराष्ट्र सहसंपादक तिलोत्तमदास बोंडे) : जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यामुळे वाघुरसह तापी काठावरील गावांना सतर्कतेचे इशारा दिला आहे. दरम्यान, सायंकाळी हतनूर धरणाचे २४ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील आवक ही वाढत आहे. सध्या धरणाचे ४ दरवाजे पूर्ण तर २ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले असून यातून २७ हजार ८२८ क्युसेक तर कालव्यातून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. पूर्णा नदीचे पुर पाणी सायंकाळपर्यंत हतनूर धरणात पोहोचण्याची शक्यता असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडावा लागणार असल्याचे जळगाव पाटबंधारे विभागाने प्रशासनास कळविले आहे.
वाघूर धरणाची पाणी पातळी आज दुपारी तीन वाजता २३२.३५० मीटर आहे. वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. रात्रीपर्यंत वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे वाघुर धरणाखालील व तापी नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे.नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.
एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्पात धरणाची सध्याची पाणी पातळी ५२ टक्के असून धरण फक्त ४ ते ५ फूट खाली आहे.सायंकाळी अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झालेला असल्याने धरणात ५२ टक्के पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात सतत वाढ होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने धरणाच्या सुरक्षितेच्यादृष्टीने धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.






