नुकतेच लोकार्पण झालेल्या डोंबिवलीच्या कोपर पुलावर पडले खड्डे

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : लोकार्पण करून ४८ तास उलटत नाहीत तोवर लगेच डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या कोपर पुलावर खड्डा पडल्याने पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेत हा खड्डा बुजवला असला तरी विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे.

डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा कोपर पूल रेल्वेने धोकादायक जाहीर केल्यानंतर १५ सप्टेंबर २०१९ रोजी तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असले तरी चार वेळा निविदा प्रसिद्ध करूनही या पुलासाठी ठेकेदार मिळत नसल्याने पुलाचे काम सुरु होऊ शकले नव्हते. अखेर रेल्वे प्रशासनाच्या मदतीने पालिका प्रशासनाने पुष्पक रेल कॉर्पोरेशन या ठेकेदाराला पूल उभारणीचे काम देत एप्रिल २०२० रोजी तातडीने पूल उभारण्याचे काम सुरु केले. यानंतर कामगाराचा तुटवडा, वेल्डिंगसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा अभाव, महावितरणच्या केबल्स, मुसळधार पाऊस यासारख्या समस्येवर मात करत प्रशासनाकडून पुलाचे काम १ वर्ष ४ महिने या कालावधीत पूर्ण झाले.

काम पूर्ण होताच ७ सप्टेंबर रोजी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या पुलाचे लोकार्पण करत गणेशोत्सवापूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र लोकापर्णला ४८ तास उलटत नाहीत तोच या पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. पुलावर पडलेला खड्डा सोशल मीडियावर भलताच ट्रोल झाला. शहरातील रस्ते खड्ड्यांनी पोखरले असले तरी नव्याने तयार करण्यात आलेल्या पुलावर देखील खड्डा पडल्याने नागरिकांनी पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here