नौपाडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; ८० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रिक्षात विसरलेले १५ तोळे सोने तक्रारदाराला मिळवून दिले

नौपाडा पोलिसांची

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) | रिक्षामधून प्रवास करत असताना तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरलेल्या महिला प्रवाशाला नौपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्यांचे दागिने सुखरूप परत मिळवून दिले आहेत. ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अत्यंत बारकाईने तपासून पोलिसांनी रिक्षाचा शोध घेतला आणि महिला तक्रारदाराच्या डोळ्यांतील अश्रू पुसले. पोलिसांच्या या उत्कृष्ट आणि तत्पर कामगिरीचे ठाणे शहरात कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ जून २०२६ रोजी रात्री ०८:३० वाजण्याच्या सुमारास तक्रारदार सौ. वंदना मनोज म्हात्रे या खारेगाव (कळवा) येथून तुळजाभवानी मंदिर (नौपाडा, ठाणे) येथे जाण्यासाठी रिक्षामध्ये बसल्या होत्या. नौपाडा परिसरात उतरताना गडबडीत त्या आपली बॅग रिक्षामध्येच विसरल्या. या बॅगेत त्यांच्या आयुष्याची पुंजी असलेले तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने आणि इतर महत्त्वाचे साहित्य होते. दागिने गहाळ झाल्याचे लक्षात येताच वंदना म्हात्रे यांनी तातडीने नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रॉपर्टी मिसिंग क्र. ८०२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला.

सोन्याचे प्रमाण आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाला तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) मंगेश भांगे, पोलीस हवालदार (पोहवा/४६९६) विलास देसाई, पोलीस शिपाई (पोशि/७६९५) सारंग कांगणे आणि पोलीस शिपाई (पोशि/२२०३१) अनिकेत उभे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.

तक्रारदार महिला ज्या रिक्षामध्ये बसली होती, ते खारेगाव नाका (कळवा) येथील घटनास्थळ तसेच रिक्षा ज्या मार्गाने पुढे गेली, त्या संपूर्ण मार्गावरील ठाणे पोलीस आयुक्तालयाचे शासकीय कॅमेरे आणि खाजगी दुकानांचे कॅमेरे असे एकूण ७० ते ८० सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी रात्रभर पडताळले.

अथक परिश्रमानंतर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयास्पद रिक्षाचा क्रमांक (एम एच ०४ जे क्यु ७८२६) शोधण्यात यश आले. या क्रमांकावरून पोलिसांनी रिक्षा मालक राजू साव याचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याच्या ताब्यातून वंदना म्हात्रे यांची १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग जशीच्या तशी हस्तगत करण्यात आली.

नौपाडा पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केलेले दागिने तक्रारदार महिला म्हात्रे यांच्या स्वाधीन केले. आपली हक्काची कमाई सुरक्षित परत मिळाल्याने म्हात्रे यांनी पोलीस प्रशासनाचे हात जोडून आभार मानले. तपास पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.नौपाडा पोलिसांची

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here