बार्शी शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांवर ‘बुलडोजर’ कारवाई; जप्त केलेले सायलेन्सर केले नष्ट

बार्शी

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढत फिरणाऱ्या हुल्लडबाज बुलेट चालकांवर बार्शी शहर पोलिसांनी आज, बुधवार रोजी एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी विविध मोहिमांमध्ये जप्त केलेल्या बेकायदेशीर आणि मॉडिफाइड सायलेन्सरवर थेट बुलडोजर फिरवून ते पूर्णपणे नष्ट केले. पोलिसांच्या या ‘सिंघम’ स्टाईल धडक कारवाईमुळे बार्शीतील टवाळखोरांचे आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या विशेष आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेत बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक (ट्रॅफिक) पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) गळकटे आणि त्यांच्या विशेष पथकाने बार्शी शहरात जागोजागी कडक नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि तीव्र आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून बार्शी शहरात मूळ सायलेन्सर बदलून फॅन्सी सायलेन्सरद्वारे फटाक्यांचे आवाज काढणे, तसेच तीव्र आवाजाने सर्वसामान्यांना त्रास देण्याचे प्रकार कमालीचे वाढले होते. या हुल्लडबाजीला कायमचा चाप लावण्यासाठी आणि समाजात कडक संदेश देण्यासाठी पोलिसांनी जप्त केलेले सर्व बेकायदेशीर सायलेन्सर रस्त्यावर ओळीने ठेवले आणि त्यावर थेट बुलडोजर (रोड रोलर) फिरवून त्यांचा चक्काचूर केला. पोलिसांच्या या आक्रमक आणि कडक भूमिकेचे बार्शीतील सुज्ञ नागरिकांमधून जोरदार स्वागत होत आहे.या धडक कारवाईनंतर बार्शी शहर पोलीस प्रशासनाने जनतेला आणि विशेषतः पालकांना जाहीर आवाहन केले आहे:

“शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व रुग्णांना नाहक त्रास देणाऱ्या अशा फॅन्सी व कर्णकर्कश सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांची यापुढे अजिबात गय केली जाणार नाही. पालकांनीही आपल्या मुलांना अशा गाड्या घेऊन देणे किंवा सायलेन्सर बदलून देण्यापासून परावृत्त करावे. यापुढेही फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या बुलेट गाड्यांवर अशीच अत्यंत कडक कायदेशीर कारवाई सुरू राहील.”

जर आपल्या परिसरातही कोणी अशा प्रकारे मॉडिफाइड सायलेन्सर वापरून शांतता भंग करत असेल, तर त्याबाबतची माहिती त्वरित बार्शी शहर पोलिसांशी संपर्क साधून द्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here