अहमदाबाद (गुजराथ) : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सर्वाचें लक्ष असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुजरात सरकारमध्ये नेतृत्व बदलाची शक्यता व्यक्त केली जात होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी रात्री ८.०० वाजता अचानक अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या कार्यक्रमाच्या आखणीत गुजरात दौऱ्याचा उल्लेख नव्हता. विमानतळावर अमित शहांच्या स्वागतासाठी राज्याचे गृहमंत्री प्रदीप सिंह जाडेजा, महापौर किरीट परमार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हितेश बारोट दाखल झाले होते.
गुरुवारी रात्री अमित शहा आपल्या बहिणीच्या घरी थांबले होते. त्यामुळे ते आपल्या कौटुंबिक कामासाठी इथे आल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, आज अचानक मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा सोपवला.
विजय रुपाणी यांनी २६ डिसेंबर २०१७ रोजी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजपनं गुजरातमध्ये १८२ पैंकी ९९ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केलं होतं. विधिमंडळ दलाच्या बैठकीत रुपाणी यांची विधिमंडळ दलाचा नेता आणि नितीन पटेल यांना उपनेता म्हणून निवड करण्यात आली होती.






