पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : साकीनाका येथे घडलेली घटना ही तीव्र असून, आरोपींना कडक स्वरूपाची शिक्षा व्हायला पाहिजे. यासाठी गृहमंत्री यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली आहे. मुळात 8 ते 10 वर्षात बलात्कार विरोधी कायदे जरी बदलले असले तरी समाजाची मानसिकता बदलणे अशक्य आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे. तसेच यात राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून, पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवत असताना बिट स्थरावर महिला दक्षता समितीचा व्याप वाढवण्यात यावा, अशी सूचना निलम गोऱ्हे यांनी केली आहे. प्रलंबित केसेसच्या तारखा लवकर घेण्यात याव्यात, जेणेकरून आरोपींना शिक्षा होईल. अशा घटना संपूर्ण भारतभर घडत असून, यावर कोणीही राजकारण करू नये, असे मतही निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.






