अमरावती (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : राज्यभरात मुसळधार पडताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणे भरली असून काही नद्यांना पूर देखील आला आहे. त्यातच आता अमरावतीमधील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे प्रवासांनी भरलेली बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातात तब्बल ११ जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील तीन जणांचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. तर इतर ८ जणांचा शोध अद्याप सुरू आहे.
वर्धा नदीकाठी असलेलं झुंज नावाचं मोठं पर्यटन तीर्थक्षेत्र आहे. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. त्या ठिकाणी गाडेगावमधील एक कुटूंब दशक्रिया विधीससाठी आले होते. मात्र काळाने घात केला आणि बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना हे बोट पलटली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. घटनास्थळावर पोलीस प्रशासन तसेच इतर स्थानिक मदत करणारे लोक देखील उपस्थित आहे. त्यांच्या सहाय्याने मदत कार्य सुरू असल्याचं स्थानिक आमदार देवेंद्र भुयार म्हणाले आहेत.






