महिला अत्याचार करणाऱ्यांमध्ये ८० टक्के परप्रांतीय, मनसेचे गृहमंत्र्यांना निवेदन

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : राज्यात महिलांवर होणाऱ्या ८० टक्के अत्याचारामागे परप्रांतीय गुन्हेगार आहेत, असा दावा मनसेने केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांची नोंद ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याचवेळी मनसेकडून हा दावा करण्यात आल्याने महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेला बळ मिळालं आहे.

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साकीनाका घटनेबाबत गृहमंत्र्यांना निवेदन देऊन पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधलं. राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये ८० टक्के परप्रांतीय गुन्हेगार आहेत.

राज ठाकरे यांनीच सर्वात आधी परप्रांतीयांच्या नोंदणीचा मुद्दा मांडला होता. त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. राज ठाकरे यांच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो, असं सांगतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर हे मतांचं राजकारण करण्यासाठी खटाटोप करत असल्याचं शालिनी ठाकरे यांनी सांगितलं.

राज्यातील महिला अत्याचारांच्या तक्रारीवर पोस्को कायदा आणि शक्ती कायदा हा नागपूर अधिवेशनात राज्यात अंमलात आला पाहिजे. साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आम्ही गृहमंत्र्यांकडे केली आहे, असं त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here