मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात बजावलेल्या समन्सविरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या अर्जावर दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच सुनावणी होणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. हा विषय एकल न्यायाधीश पीठासमोर सुनावणीस आल्याबद्दल उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने नोंदवलेली हरकत योग्य असल्याचा निर्वाळा न्या. संदीप शिंदे यांनी आपल्या निर्णयात दिला.
भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी सीबीआयने एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीनेही देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. ‘देशमुख यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या माध्यमातून मुंबईतील रेस्टॉरंट व बारकडून चार कोटी ७० लाख रुपये गोळा केले आणि ही रक्कम त्यांच्या कुटुंबाचे नियंत्रण असलेल्या नागपूरस्थित श्री साई शिक्षण संस्थेत वळवली’, असा ईडीचा आरोप आहे.
ईडीने वारंवार समन्स बजावल्यानंतर देशमुख यांच्याविरोधात लुकआऊट नोटीसही काढली. मात्र, देशमुख यांनी या आरोपांचे खंडन करत वारंवार न्यायालयात धाव घेतली. तरीही त्यांना अपयश आले. आता ईडीच्या समन्सला आव्हान देणारा अर्ज देशमुख यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत दाखल केला आहे.






