जेईई-मेन्सचा निकाल जाहीर; महाराष्ट्राचा एकमेव अथर्व अभिजीत तांबट टॉपमध्ये

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : राष्ट्रीय परीक्षण एजन्सी (एनटीए) नं इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईई-मेन्सचा निकाल मंगळवार रात्री जाहीर करण्यात आला. जाहीर केलेल्या निकालात एकूण ४४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. तर १८ विद्यार्थ्यांना टॉप रँक मिळाली आहे. शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री यासंदर्भात माहिती दिली.

यावर्षी ७ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या १८ जणांनी रँक १ मिळवली आहे. त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्र प्रदेशचे सर्वाधिक ४ तर त्यापाठोपाठ राजस्थानचे ३, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी २ विद्यार्थी टॉप १८ मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक ६ विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वनवर कर्नाटकचा गौरब दास आहे.

यावर्षापासून संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळू शकेल. पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा मार्चमध्ये आयोजित करण्यात आला होता. पुढील टप्प्यातील परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये पार पडणार होत्या. परंतु, देशात कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. तिसरा टप्पा २०-२५ जुलैपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तर चौथा टप्पा २६ ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here