ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : घरासमोर खेळत असलेल्या चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. ५ वर्षांच्या चिमुकल्याचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.
पाच वर्षांचा चिमुरडा शेजारच्या विहिरीत पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीमधील खंबाळपाडा भोईरवाडी येथील सिताई नगर मध्ये घडली आहे. सिद्धार्थ गणेश कानगट्ट असे या मयत मुलाचे नाव आहे. सिद्धार्थ दिव्यांग होता. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर खेळत होता. बऱ्याच वेळाने सिद्धार्थ कोठेही दिसत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला मात्र तो सापडला नाही.दुपारच्या सुमारास शेजाऱ्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता सिद्धार्थ पाण्यावर तरंगताना आढळला. नागरिकांनी तातडीने त्याला पाण्यातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






