पोलिस कर्मचाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होत पोलिस आयुक्तांनी दिला खांदा

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : आडगाव परिसरातील पोलिस कर्मचारी प्रतीक जाधव यांचं निधन झालं. त्यावेळी पोलिस आयुक्त दीपक पांडेय एकदम भावुक झाले. त्यांनी जाधव यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांना खांदाही दिला.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, एकदम मनमिळावू म्हणून परिचित अससेले तरुण पोलिस कर्मचारी प्रतीक जाधव यांचं अचानक निधन झालं. ते अवघ्या 31 वर्षांचे होते. प्रतीक हे दंगल नियंत्रण पथकात कार्यरत होते. ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळं त्याच्यांवर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही बातमी समजली. त्यांनी तातडीनं पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या कानावर ही खबर घातली.

पांडेय यांनाही या बातमीनं धक्का बसला. इतक्या कमी वयात त्यांचं जाणं असं साऱ्यांनाच हुरहुर लावणारं होतं. त्यामुळं पोलिस आयुक्त पांडेय यांनी तातडीनं जाधव कुटुंबांचं घर घातलं. त्यांच्या घरातील मंडळींना दिलासा दिला. ते स्वतः प्रतीक यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. मृत जाधव यांचे नातेवाईक सागर जाधव यांच्यासह स्वतः पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनीही पार्थिवास खांदा दिला. जाधव यांच्या जाण्याचा पोलिस आयुक्तांना चांगलाच धक्का बसला. अधिकारी कितीही मोठा असला, तरी त्याच्या आतल्या एका कोपऱ्यात एक हळवा माणूस दडलेला असतो. त्याचचं दर्शन यावेळी झालं. प्रतीक यांच्या मृत्यूनं साऱ्यांनाच चटका लावला. पोलिस कर्मचाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here