नागपूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईची तलवार काही हटण्याचे नाव घेत नाही. काल आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड टाकली. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड टाकली आहे. नागपुरातील मिडास बिल्डिंगमधील साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे. या कारवाई दरम्यान इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे पथक सुद्धा उपस्थित आहे.
शुक्रवारी १६ तास झाडाझडती अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आणि त्यासोबतच त्यांच्या इतरही मालमत्तांवर आयकर विभागाने शुक्रवारी धाड टाकली. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून तब्बल १६ तास झाडाझाडती करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत अनिल देशमुख यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरातून निघाले. यावेळी अनिल देशमुख यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स आपल्यासोबत नेल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्या घरी शुक्रवारी ज्यावेळी आयकर विभागाने धाड टाकली त्यावेळी त्यांच्या घरी अनिल देशमुख आणि त्यांची दोन्ही मुलं उपस्थित नव्हते. तर अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि सून घरी होत्या.






