औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : जालना जिल्ह्यातील अंबड येथून देवदर्शन करुन गावाकडे परत जात असताना शहापुर गावाजवळ अज्ञात वाहनांनी दुचाकीला धडक देवून २५ वर्षीय महिला जागीच ठार झाले तर बापलेक या अपघातात जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि.१८) दुपारच्या सुमारास घडला.
गेवराई तालुक्यातील किनगाव येथील पांडुरंग मधुकर चाळक (३१) व पत्नी स्वाती पांडुरंग चाळक (२५) हे त्यांच्या मुलाला घेऊन अंबड येथे देवदर्शनाला गेले होते. पती-पत्नीसोबत मुलगा ही होता. देवदर्शन करून त्यांच्या स्प्लेंडर बाईकवरून ते किनगाव गावी परत जात असताना जालना- वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावरील शहापूरजवळ येताच अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली.
या अपघातात स्वाती चाळक यांना जबर मार लागल्याने त्या जागीच मुत्युमुखी पडल्या तर पांडुरंग व त्यांच्या मुलगा दोघेही गंभीरीत्या जखमी झाले आहेत. त्यांना अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.






