लस घेण्यास नकार दिल्याने ‘त्यांनी’ महिलेचे विजेचं, नळाचं कनेक्शन कापलं; रेशनकार्ड जप्त केलं

भोपाळ (मध्यप्रदेश) : देशात सर्वत्र कोरोना लसीकरणाचे वारे जोरात वाहत आहेत. लसीकरण मोहीम मोठा टप्पा पार करत असतांना मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कोरोना लस घेण्यास एका कुटुंबाने नकार दिल्याने त्यांचं विजेचं, नळाचं कनेक्शन कापल्याची तसेच रेशनकार्ड जप्त केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या पूजा कॉलनीमध्ये राहणाऱ्या वाहिदा खान यांच्या कुटुंबीयांनी लस देण्यासाठी घरी आलेल्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, “एक टीम लसीकरणाची माहिती घेण्यासाठी घरी आली होती. तेव्हा त्यांना अलर्जी असल्यामुळे अद्याप कोरोना लस घेतली नसल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. तसेच २८ तारखेला आम्ही लस घेऊ असं देखील सांगितलं. पण आलेल्या टीमने आताच्या आता लस घेण्यासाठी दबाव टाकला. जेव्हा आम्ही यासाठी तयार झालो नाही तेव्हा त्यांनी आमच्या घराचं विजेचं आणि नळाचं कनेक्शन कापलं. तसेच आमचं रेशनकार्ड देखील जप्त” केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. वाहिदा यांनी कोरोना लस देण्यासाठी एक टीम घरी आली होती. त्यामध्ये सीएमओ आणि एसडीएम देखील होते असं म्हटलं आहे.

आम्ही कोरोना लस घेण्यास नकार दिला असता अधिकाऱ्यांनी नगरपालिका आणि वीज विभागातील काही लोकांना बोलावून घेतलं. त्यांनी आमचं पाण्याचं आणि विजेचं कनेक्शन कापलं. आमचं रेशनकार्ड देखील ते घेऊन गेले असं वाहिदा यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी कोरोना लसीकरणाचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळत असल्याचं म्हटलं आहे. जर खरंच अशा स्वरुपाची घटना घडली असेल तर त्याचा अधिक तपास करण्यात येईल. तसेच याबाबच चौकशी सुरू आहे. तपासात काही समोर आल्यास त्याचं कापण्यात आलेलं कनेक्शन जोडून देण्यात येईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here