मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज सोमय्या यांनी कोल्हापूरला जाणार असल्याची घोषणा केली असता मुंबई पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं होतं. संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सोमय्यांच्या घराबाहेर लावण्यात आला होता. पण, अखेर तो आता हटवण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती.
त्याच बरोबर कोल्हापूर पोलिसांनी सुद्धा सोमय्यांना कोल्हापूरमध्ये न येण्यास सूचना केली होती. पण, सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते. त्यामुळे संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्यांना घरीच स्थानबद्ध केलं होतं. किरीट सोमय्यांना स्थानबद्ध केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर १०० पोलिसांनी वेढा दिला. या सरकारच्या कार्यकाळात मुंबईत आतंकवादी उजळ माथ्याने फिरत आहेत, परंतु सत्ताबळ वापरून या सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थितीत केला.
भाजपच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतर सोमय्यांच्या घराबाहेरील पोलिसांचा बंदोबस्त दोन तासांनंतर हटवण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी घरीच स्थानबद्ध कारवाई केल्यामुळे किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारची ही गुंडगिरी आहे. पोलीस दडपशाही आहे. माझा घराखाली पोलिसांची गर्दी केली आहे. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी आणि हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी मला मुलुंडच्या माझा घरातून अटक करण्याचे काम महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे, असा आरोपच सोमय्यांनी केला आहे. ‘हसन मुश्रीफ यांचे घोटाळे बाहेर काढले. मी कोल्हापूरमध्ये जाऊन कागल परिसरात पाहणी करणार होतो.
पुढे बोलताना ते म्हणाले की, घोटाळे ठाकरे सरकार करत आहे, त्यांचे मंत्री करत आहे, अटक त्यांना केली जात नाही, उलट मला अटक केली जात आहे, असं काम फक्त हे सरकार करू शकतं, अशी टीकाही सोमय्यांनी केली. ‘मला गणपती विसर्जनाला जाऊ दिले जात नाही, मी आज संध्याकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाणार आहे, कागलमधील मुश्रीफ यांची गैरव्यवहाराचा भांडाफोड केल्यानंतर परत येणार आहे’, असंही सोमय्यांनी यावेळी सांगितलं.






