औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहापुरजवळ वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला १२ तास उलटत नाही तोच त्याच ठिकाणी आणखी एक अपघात घडला आहे. पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या ट्रकला सळया वाहून नेणाऱ्या ट्रकने मागून जौरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झला आहे. या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याने शहापूरजवळील हा वळण रस्ता मुत्यूचे वळण बनला आहे. हा अपघात रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला.
अंबड येथून देवदर्शन करुन गावाकडे जात असताना शहापूर जवळील वळण रस्त्यावर दूचाकीला अज्ञात वाहनाने शनिवारी धडक दिली होती. या अपघातात स्वाती पांडुरंग चाळक या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती आणि मुलगा जखमी झाले होते. या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोच याच वळण रस्त्यावर मैद्याचे पोते घेऊन अंबडहून गेवराईकडे ट्रक निघाला होता. तो पंक्चर झाल्याने पंक्चर काढण्यासाठी या रस्त्यावर थांबला होता. त्याचवेळी जालन्याकडून सळई घेऊन जाणारा ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक दिली.
या अपघातात मोहम्मद रफिक ईस्माइल ( वय ५०, रा.बागेवाडी ता. चित्तापुर जि.कुलबर्गी ,कर्नाटक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजू ( रा.गुलबर्गा) आणि तूकाराम वाघमारे (रा मुळेगाव ,ता.जि.सोलापूर) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ते वाहनाखाली दबले गेले होते. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून अंबड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. नेमका कोणाचा मृत्यू झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.






