तुळजापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल १ वर्ष फरार होता.
पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे ९ मे २०१९ रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती, त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याचा ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे ३४८.६६१ ग्रॅम सोने व सुमारे ७१६९८.२७४ ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच ७१ प्राचीन नाणे यांची वैयक्तिक स्वार्थासाठी चोरी केली.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ४२०, ४६४, ४०९, ४६७, ४६८, ४७१, ३८१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी मुधोळ यांची बदली झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिल्यावर रविवार, १३ सप्टेंबर २०२० रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने तात्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी विरोधात फसवणूक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तुळजाभवानी देवीला अनेक राजे महाराजे यांनी सोने चांदी दागिन्यासह नाणी अर्पण केली होती त्याची नोंद मंदिर संस्थांच्या वहीत होती मात्र पदभार स्वीकारताना व देताना अनेक मौल्यवान वस्तू व दागिने गायब करून त्याचा काळाबाजार करण्यात आल्याचे चौकशी समितीत सिद्ध झाले आहे. देवीच्या खजिन्यातील शिवकालीन नाण्यासह इतर संस्थानची नाणी वस्तूवर डल्ला मारला असून यात मंदिर संस्थांनचे काही अधिकारी घरचे भेदी निघाले आहेत. या घोटाळ्यातील गुन्ह्यात सहभागी अधिकारी यांची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसते. यापूर्वी तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या अनेक महागड्या वस्तू, साड्या, चांदीच्या मूर्ती या तत्कालीन मंत्री, राजकारणी व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना भेट देऊन त्याची मेहेरनजर मिळवण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे ही नाणी नाईकवाडी यांनी गायब करण्यामागे खरा सूत्रधार समोर येणे गरजेचे आहे.
Home राज्य पश्चिम महाराष्ट्र तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकास वर्षभराने अटक






